सर्वेक्षणातून होणार विणकरांची शासकीय नोंदणी; विणकरांना ओळखपत्र देऊन मिळणार शासकीय योजनांचा लाभ
मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवल्यात विणकर सर्वेक्षणास सुरुवात
येवला,दि.११ ऑगस्ट:- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवल्यातील विणकरांच्या सर्वेक्षणास दि.८ ऑगस्ट २०२४ पासून सुरुवात झाली आहे. या सर्वेक्षणातून सर्व विणकर बांधवांची नोंदणी होऊन त्यांना शासकीय ओळखपत्र मिळणार आहे. त्यातून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे.
येवल्यातील अनेक विणकर बांधवांकडे केंद्र शासनाचे ओळखपत्र नसल्याने त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. मंत्री छगन भुजबळ यांनी विणकर बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी त्यांची नोंदणी होऊन त्यांना ओळखपत्र मिळण्यासाठी राज्याचे वस्त्रउद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांचेसोबत चर्चा केली होती तर वस्त्रउद्योग आयुक्तांना येवल्यातील विणकरांची नोंदणी आणि ओळखपत्राबाबत सूचना केल्या होत्या.त्यानुसार विणकर बांधवांच्या सर्वेक्षणासाठी सुरुवात करण्यात आली आहे. ज्या विणकर बांधवांकडे ओळखपत्र नाही त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन पैठणी कलाकारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
या सर्वेक्षणात विणकाम व्यतिरिक्त पैठणी साडी तयार करण्यासाठी मदतनीस म्हणून काम करतात त्यात रेशीम कळ्या उखलन्याचे काम करणारे कारागीर,कांड्या, काकडे भरणारे, चिवट्या करणारे, सांधणी करणारे, रंगणी करणारे व त्या कामात मदत करणारे कारागीर या सर्वांची नोंदणी होऊन त्यांना देखील विणकर ओळख मिळणार आहे.
वस्त्रोद्योग विभागाकडे सुरू करण्यात आलेले विणकर सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर या विणकर बांधवांना शासकीय ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्यानंतर विणकर बांधवांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. यामध्ये २०० युनिट पर्यंत मोफत वीज, उत्सव भत्ता, रेशीम खरेदीवर १५ टक्के राज्य सरकार व १५ टक्के केंद्र सरकारकडून सूट यासह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे.
या नोंदणीसाठी पैठणी कलाकारी असोसिएशन येवल्याचे संचालक शांतीलाल भांडगे, प्रविण पहिलवान, दत्तात्रय मुंगीकर, सुनिल भावसार, लालचंद बोनदारडे, मंगेश बाकळे, किरण नागपुरे यांनी विशेष पाठपुरावा केला.
Comments
Post a Comment