मविप्रचा सर्वोत्कृष्ट कबड्डी खेळाडू पुरस्कार पूजा कुमावतला जाहीर

नाशिक :- नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर व माजी खासदार-आमदार, मविप्र संस्थेचे सभासद दिवंगत ॲड. उत्तमराव ढिकले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे नाशिक जिल्ह्याच्या कबड्डी क्षेत्रातील सर्वोकृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूस दरवर्षीप्रमाणे दिला जाणारा ‘ॲड. उत्तमराव ढिकले सर्वोत्कृष्ट कबड्डी खेळाडू-२०२४’ हा पुरस्कार नाशिकमधील पूजा सोहनलाल कुमावत या राष्ट्रीय खेळाडूला जाहीर करण्यात आला आहे.पुरस्काराचे सातवे वर्ष आहे. ॲड. उत्तमराव ढिकले हे नाशिक जिल्ह्यातील कबड्डीचे उत्कृष्ट खेळाडू होते. तसेच, नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्षपदही त्यांनी भुषविले होते. खासदार असताना त्यांनी संसदेत केलेल्या भाषणापैकी क्रीडा व आरोग्याचे महत्व अधोरेखित करणारे भाषण उल्लेखनीय ठरले होते.  सदर पुरस्कारासाठी संस्थेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक जिल्ह्यातील २० वर्षांपुढील कबड्डी खेळाडू मुले व मुलींनी संस्थेकडे प्रस्ताव सादर केले होते. किमान अधिकृत राज्यस्तरीय, आंतर विद्यापीठ, खेलो इंडिया किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाच्या स्पर्धांमधील सहभाग, मागील तीन वर्षांतील कबड्डी खेळातील प्रावीण्य या सर्व बाबींचा विचार करून निवड समितीने सदर पुरस्कारासाठी पूजा कुमावत या खेळाडूच्या नावाची घोषणा केली. येत्या सोमवारी (दि.१९) कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात होणाऱ्या मविप्रच्या समाज दिन कार्यक्रमात बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या पुरस्कारचे वितरण होणार आहे. ११ हजार रुपये रोख, प्रमाणपत्र व करंडक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.निवड समितीचे अध्यक्ष तथा संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती देवराम मोगल यांनी पूजा कुमावत हिच्या निवडीचे स्वागत केले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी हा पुरस्कार आशियाई कबड्डी स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता खेळाडू आकाश शिंदे यास देण्यात आला होता.
पूजा कुमावतचा थोडक्यात परिचय
पूजा कुमावत ही मविप्रच्या सायखेडा महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून, नाशिकरोड येथील बालाजी सोशल फाउंडेशनची खेळाडू आहे. वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना तिच्या अष्टपैलू कामगिरीने महाराष्ट्र संघाला कांस्यपदक मिळवून दिले आहे. तसेच, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला खेलो इंडिया स्पर्धेतदेखील पदक मिळवून देण्यात तिने मोलाची कामगिरी केली आहे.


Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन