मविप्र रुग्णालयात ३२ देहदात्या नातेवाईकांचा कृतज्ञता सत्कार

नाशिक : आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित समाज दिन व देहदात्यांच्या नातेवाईकांच्या कृतज्ञता सत्कार सोहळ्याप्रसंगी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, डॉ. नारायण सोनवणे, शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे, डॉ. कवडे, अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे, डॉ. प्रफुल्ल दखणे व मान्यवर
देहदान चळवळ तळागाळात रुजावी : पोलीस अधीक्षक देशमाने

नाशिक :- अवयवदान व देहदानासारखे उपक्रम समाजासाठी गरजेचे असून, पाश्चात्य देशाप्रमाणे आपल्या भारतातही अवयवदान आणि देहदान चळवळ तळागाळात रुजली गेली पाहिजे,असे मनोगत  पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी व्यक्त केल.
मविप्रच्या आडगाव येथील डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रात समाजदिनानिमित्त आयोजित वैद्यकीय शिक्षणाकामी देहदान करणाऱ्या देहदात्यांच्या नातेवाईकांच्या कृतज्ञता सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, सर्व कार्यकारिणी पदाधिकारी आणि शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर गणपत दादा मोरे, कर्मवीर डी. आर. भोसले, कर्मवीर काकासाहेब वाघ, कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे, कर्मवीर ॲड. बाबुराव ठाकरे, कर्मवीर ॲड. विठ्ठलराव हांडे, कर्मवीर डॉ. वसंतराव पवार या समाजधुरिणांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
ज्येष्ठ मविप्र सदस्य डॉ. नारायण सोनवणे, जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने,शिक्षणाधिकारी डॉ.ज्ञानेश्वर लोखंडे, डॉ. कवडे, अधिष्ठाता डॉ.सुधीर भामरे यांच्या हस्ते डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, फिजिओथेरपी, नर्सिंग आणि फार्मसी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मविप्र समाज ध्वजारोहण व ध्वजपूजन करण्यात आले. राष्ट्रगीत व मविप्र समाजगीताने ध्वजाला मानवंदना देण्यात आली. 

ध्वजारोहण कार्यक्रमानंतर मविप्र रुग्णालयातील कर्मवीर रावसाहेब थोरात एमसीआय सभागृहात शरीररचनाशास्त्र विभागाच्यावतीने देहदात्यांच्या नातेवाईकांचा कृतज्ञता सत्कार सोहळा संपन्न झाला. शरीररचनाशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. मनीषा राजळे-पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे, अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे, विभाग प्रमुख डॉ. प्रफुल्ल दखणे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. अधिष्ठाता डॉ.भामरे यांनी कर्मवीरांना अभिवादन करत मविप्र संस्था आणि डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथील सोयी आणि सुविधांची माहिती दिली. तर प्रमुख पाहुणे डॉ.नारायण सोनवणे यांनी वैद्यकीय शिक्षणाच्या उपयोगासाठी देहदान करून देहदात्यांनी उद्याच्या पिढीतील प्रशिक्षित डॉक्टर घडविण्यात अमूल्य योगदान दिले असून, देहदानाचे हे काम निस्पृहपणे निरंतर सुरू राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. 
देहादात्यांच्या नातेवाईकांनी यानिमित्त दिवंगत देहदात्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. महाविद्यालयातील देहदान उपक्रमामुळे वैद्यकीय शिक्षण घेण्यात मोठी मदत होत असल्याचे एमबीबीएसच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी वैष्णवी नारायणकर हिने सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन २०२३-२४ या वर्षात एकूण ३२ देहदान केलेल्या देहदात्यांच्या नातेवाईकांना तुलसी रोप, कृतज्ञता सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.  
 या कार्यक्रमास उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. कल्पना देवणे, फिजिओथेरपीच्या प्राचार्या डॉ. अमरित कौर, परिचर्या शिक्षण संस्थेच्या प्राचार्या पौर्णिमा नाईक, फार्मसीचे प्राचार्य डॉ. नितीन हिरे तसेच सर्व विभागप्रमुख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक समितीचे प्रा.मिलिंद देशपांडे, क्रीडा संचालक प्रा.दिलीप गायकवाड, शरीररचनाशास्त्र विभागातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्नशील होते.

आजवर ३१८ देहदान प्राध्यापक डॉ.संतोष शिंदे यांनी महाविद्यालयातील देहदान उपक्रमाबद्दल माहिती देत नॅकसारख्या राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाण परिषद उपक्रमात डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालयाचा देहदान उपक्रम देशात उल्लेखनीय ठरला असल्याचे सांगत आभार मानले. डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाला आजवर एकूण ३१८ देहादात्यांनी देहदान केले असल्याचे सहाय्यक प्रा. डॉ. कुशल शुक्ल यांनी सांगितले.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला