राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
निफाड (प्रतिनिधी) : हॉटेल व्यवसायाच्या कामात त्रुटी न काढता सुरळीत ठेवण्याच्या मोबदल्यात नऊ हजार रुपयांची लाच घेतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी लोकेश संजय गायकवाड (वय 35), पंडीत रामभाऊ शिंदे (वय 60) व प्रवीण साहेबराव ठोंबरे (वय 47) या तिघांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की तक्रारदार यांचे निफाड तालुक्यात रेस्टॉरंट व बार आहे. हॉटेल व्यवसायाच्या कामात त्रुटी न काढता ते सुरळीत चालू ठेवण्याच्या मोबदल्यात लोकेश गायकवाड यांनी वार्षिक हप्ता म्हणून एक हॉटेलसाठी चार हजार रुपये असे एकूण तीन हॉटेलसाठी बार हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती तिन्ही हॉटेलमिळून त्याने नऊ हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार याने याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा लावला होता. या सापळ्यात काल पंडीत रामभाऊ शिंदे,वय 60, रा.निफाड, प्रविण साहेबराव ठोंबरे,वय 47, रा. निफाड,यांना राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिकारी गायकवाडसाठी नऊ हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडण्यात आले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलिस अधिक्षक नारायण न्याहळदे, पोलिस उपअधिक्षक नरेंद्र पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदिप सांळूके, पोलिस हवालदार पंकज पळसीकर,पोलिस नाईक प्रभाकर गवळी, प्रफुल माळी, नितीन कराड व परशराम जाधव, यांच्या पथकाने केली.
Comments
Post a Comment