'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करावे' - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सेवा सुविधांसंदर्भात आढावा बैठक

मुंबई :-दि.३/४/२०२५  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सेवा सुविधांसंदर्भात आढावा बैठक पार पाडली. या जयंती सोहळ्याचे भव्य, दिव्य आणि दिमाखदार आयोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

जयंतीसाठी देशभरातून लाखो नागरिक चैत्यभूमीवर येतात. त्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंत्रणांना दिलेले निर्देश:

सर्व यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे

मुंबई महानगरपालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रम व अन्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने होत असलेल्या तरतुदीसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करावे

चैत्यभूमी येथे अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे, महापालिका, गृह विभाग व सामाजिक न्याय विभाग तसेच संबंधीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे

संबंधित यंत्रणांनी स्वच्छतेबाबतही दक्षता घ्यावी

गर्दी टाळण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यावी. तसेच दादर आणि संबंधित परिसरात वाहतूक पोलिसांनी रहदारीचे योग्य नियंत्रण व जागोजागी सूचना फलक लावावेत

चैत्यभूमी परिसरात अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी आणि नागरिकांसाठी उन्हापासून संरक्षणासाठी मंडप, प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था करणे

बेस्ट प्रशासनानेही दादर स्टेशन ते चैत्यभूमीदरम्यान पुरेशा प्रमाणात बससेवा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून नागरिकांना सुविधा होईल

सदर बैठकीत पोलीस पथक मानवंदना, चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, शिवाजी महाराज मैदानावरील भव्य निवास मंडप, तेथील आपत्कालीन व्यवस्थेसह, आरोग्य सुविधा, प्रदर्शन मंडप, चैत्यभूमी स्तूप व परिसराची सजावट, "लोकराज्य" विशेषांक, शासकीय जाहिरात प्रसिध्दी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सबंधीत विभाग व यंत्रणांना आवश्यक ते दिशानिर्देश दिले. बैठकीत मुंबई महापालिकेच्या वतीने नियोजनाची सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे मुख्यमंत्री व उपस्थितांना देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या हस्ते महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या पोस्टरचे अनावरण देखील करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. संजय बनसोडे, राज्याच्या मुख्य सचिव, राज्याच्या पोलीस महासंचालक, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीचे सरचिटणीस यांच्यासह दादर चैत्यभूमी स्मारक समितीचे प्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला