नाशिक महानगर पालिकेतील कामकाजाचे ई ऑफिस प्रणाली प्रशिक्षण संपन्न
नाशिक :- महानगर पालिकेतील ई ऑफिस प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी पुढाकार घेतला आहे.आज मनपाच्या स्थायी समिती सभागृहात कर्मचाऱ्यांसाठी इ ऑफिस कार्यप्रणालीच्या व्यापक प्रशिक्षणाची तयारी करण्यात आली होती. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून पारंपारिक कागदी प्रक्रियेचा वापर कमी करून संगणकीय प्रणालीद्वारे फायलींचा वेगवान, गतिमान व पारदर्शक प्रवास सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
प्रशिक्षण सत्रात डायरेक्टरेट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉंलॉजीचे चेतन सोंजे यांनी प्रशिक्षण दिले. त्यांनी ई ऑफिस प्रणालीचे महत्त्व, त्याचे फायदे आणि कार्यप्रणाली यांची सखोल माहिती देत कर्मचाऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा आत्मसात करण्यास उद्युक्त केले. चेतन सोंजे यांनी असे सांगितले की, “ई ऑफिस प्रणालीमुळे फक्त कागदी प्रवास संपणार नाही तर कारभारात एक नवीन गती आणि कार्यक्षमता येईल.”
प्रशिक्षण सत्रात उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर,माहिती तंत्रज्ञान विभागाचे उपअभियंता नितीन धामणे यांसह इतर मनपाचे खातेप्रमुख यांनी उपस्थित राहून सहभाग घेतला. सर्व उपस्थितांनी प्रशिक्षणाची प्रशंसा केली आणि भविष्यातील ई-कारभाराच्या दृष्टीने ही पावलं अत्यंत महत्वाची ठरणार असल्याचे मत मांडले.
मनपाच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांना टप्प्याटप्प्याने इ ऑफिस कार्यप्रणालीचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती उपायुक्त साताळकर यांनी दिली.
हा पुढाकार नाशिक महानगर पालिकेतील पारदर्शक व गतिमान कारभाराच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल असून, नवीन ई ऑफिस प्रणालीद्वारे कार्यप्रवाह अधिक सुलभ, पारदर्शक व जलद होईल. यामुळे पालिकेच्या प्रशासकीय कार्यक्षमतेत सुधारणा होण्यास निश्चितच मदत मिळेल अशी अपेक्षा उपआयुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी व्यक्त केला.
Comments
Post a Comment