मुलांच्या शारीरिक-मानसिक क्षमतेसाठी धनुर्विद्या खेळ महत्वपूर्ण - पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव
राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे नाशकात शानदार उद्घाटन
नाशिक : कोणत्याही स्पर्धेतील दर्जेदार कामगिरीसाठी खेळाडूंची शारिरीक क्षमता जेवढी महत्त्वाची असते, तेवढीच मानसिक क्षमतादेखील महत्त्वपूर्ण असते. कारण खेळाडू शारिरीक सक्षम असला तरच मानसिकदृष्ट्याही सक्षम असतो. अशावेळीच स्वतःसह त्याच्या संघाची कामगिरी उंचावते, असे मत नाशिकचे पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव यांनी व्यक्त केले.
नाशिक येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित 23 व्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे महासचिव प्रमोद चांदुरकर होते.
व्यासपीठावर होरायझन अकॅडमीच्या मुख्याध्यापिका श्रुती देशमुख, ॲड. स्मिता बच्छाव, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे कोषाध्यक्ष रंगराव साळुंखे, कार्यकारिणी सदस्य अभिजीत दळवी, प्रवीण गडदे, नाशिक जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे उपाध्यक्ष सुनील पाटील, सचिव मंगल शिंदे पाटील, कोषाध्यक्ष संजय होळकर, स्पर्धा संचालक प्रवीण सावंत, वाशिम जिल्हा सचिव अनिल थडकर, यवतमाळ जिल्हा सचिव अमर जाधव, जालना जिल्हा सचिव प्रकाश दुसेजा, धुळे जिल्हा सचिव प्रकाश पाटील, आंतरराष्ट्रीय कोच चंद्रकांत इलग, प्रफुल डांगे, प्रतीक थेटे, अमोल बोरीवाले, दिपक चिकणे, कुणाल तावरे आदिंसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र डेरले यांनी, तर मंगल शिंदे पाटील यांनी प्रास्ताविक केले. संजय होळकर यांनी आभार मानले.
महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या अधिपत्याखाली नाशिक जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या वतीने 23 वी सब ज्युनिअर धनुर्विद्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धा इंडियन रिकर्व आणि कंपाऊंड राऊंड प्रकारात घेण्यात येत आहेत. स्पर्धेत राज्यभरातून ८५० धनुर्धर, पंच, मार्गदर्शक, व्यवस्थापक, पदाधिकारी सहभागी झाले असून, या स्पर्धेतून जयपुर राजस्थान येथे होत असलेल्या राष्ट्रीय सब ज्युनिअर धनुर्विद्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ निवडण्यात येणार आहेत.
स्पर्धा यशस्वीतेसाठी महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह नाशिक जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे पदाधिकारी धनुर्धर कोचेस पालक आणि क्रीडाप्रेमी परिश्रम घेत आहेत.
Comments
Post a Comment