नाशिकमधून ऑलिम्पियन घडण्याच्या दृष्टीने स्पर्धा महत्त्वपूर्ण - ॲड. नितीन ठाकरे
राज्य धनुर्विद्या स्पर्धेचा समारोप : नाशिकच्या वैष्णवी, सृष्टी, साक्षी, तनुश्री, अर्षिता व अंकुरला सुवर्णपदक
नाशिक :- जिल्ह्यात खेळ आणि खेळाडू वाढीसह गुणवंत व दर्जेदार खेळाडू घडविण्याच्या दृष्टीने राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धा होणे अत्यंत गरजेचे आहे. एखादा ऑलिम्पियन घडण्याचे प्रत्येकाचेच स्वप्न असते. भविष्यात नाशिकमधून ऑलिम्पियन घडविण्याच्या दृष्टीने या स्पर्धा निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत आयोजन समितीचे अध्यक्ष तथा मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना आणि नाशिक जिल्हा धनुर्विद्या संघटना यांच्या वतीने नाशिकमध्ये सुरु असलेल्या २३ व्या सब ज्युनिअर राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे कोषाध्यक्ष रंगराव साळुंखे, कार्यकारिणी सदस्य अभिजीत दळवी, प्रवीण गडदे, स्पर्धा संचालक प्रवीण सावंत, नाशिक जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील पाटील, सचिव मंगल शिंदे-पाटील, भारतीय संघ प्रशिक्षक प्रतिक थेटे, अमर जाधव, कुणाल तावरे, स्वप्निल भुयार आदींसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेत नाशिक जिल्ह्याने ३ सुवर्ण, १ रौप्य आणि ३ कास्यपदक पटकाविले आहेत. यामध्ये इंडियन राउंड मुलींमध्ये श्रुती काळे, तनुश्री सोनवणे, साक्षी टोपले आणि अर्शिता सोनी यांनी सांघिक सुवर्णपदक, रिकव्हर राऊंड प्रकारात मुलींमधून वैष्णवी कुलकर्णी हिने वैयक्तिक १ सुवर्णपदक व १ कास्यपदक आणि अंकुर आठरे याने वैयक्तिक कास्यपदक तर वैष्णवी कुलकर्णी, ऋतुजा पवार, तनुजा कुलकर्णी आणि अर्णवी घायतड यांनी रौप्यपदक, मुलांमधून अंकुर आठरे, कृष्णा सोनवणे, अथर्व आहेर, विनय जाधव यांनी सांघिक कास्य पदक तर मिक्स टीममध्ये वैष्णवी कुलकर्णी आणि अंकुर आठरे यांनी सुवर्णपदक पटकाविले आहे.
स्पर्धेत नाशिक, क्रीडा प्रबोधिनी, सोलापूर, अहिल्यानगर, बुलढाणा, जालना, पिंपरी चिंचवड आणि लातूर जिल्ह्यातील धनुर्धरांचे वर्चस्व राहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रतीक थेटे, ज्ञानेश्वर थेटे, अभिजीत थेटे, मोहन कसबे, अक्षय थेटे, सागर महाले यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कोचेस, खेळाडू, पालक आणि क्रीडाप्रेमींनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment