गाडी चालविताना मोबाइलचा वापर करू नका
मविप्र विधी महाविद्यालयातर्फे वाहतूक नियमांचा जागर
नाशिक :- ‘गाडी चालविताना मोबाइलचा वापर करू नका..., हेल्मेट-सीट्बेल्टचा अवश्य वापर करा, जिथे असेल शाळा, तिथे वेगमर्यादा पाळा..,असे सूचनाफलक हाती घेऊन मविप्र विधी महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी शहरातील विविध सिग्नल्सवर थांबून वाहतूक नियमांचा जागर केला.
मविप्र विधी महाविद्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि नाशिक शहर वाहतूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयातील विधी सहाय्य विभागाने स्वयंसेवकांच्या माध्यमातून शहरामधील विविध सिग्नल्स परिसरात रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली. यावेळी स्वयंसेवकांनी फलकांद्वारे व प्रत्यक्ष वाहनचालकांना सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक नियम कसे महत्वाचे आहेत, हे समजावून सांगितले. यावेळी वाहनधारकांना वाहतूक नियम पाळण्याचे आवाहनही करण्यात आले. हेल्मेट वापरा, सिग्नल पाळा, सीट बेल्ट नियमित लावा, गाडी चालवताना मोबाइलचा वापर करू नका आदी घोषणा असलेले फलक हाती घेऊन वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमासाठी मविप्र विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या गडाख, शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक हिरामण भोये, प्रादेशिक परिवहन कार्यालातील सहायक मोटार वाहन निरीक्षक रवींद्र म्हस्के, पोलीस हवालदार सचिन जाधव, विधी सहाय्य विभाग समन्वयक प्रा. तेजस्विनी जामदार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवक विदयार्थ्यांसह शहर वाहतूक शाखा व पोलीस अंमलदार यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment