मविप्र प्रज्ञा केंद्राचा प्रवास हा सरस्वती कडून लक्ष्मीकडे व्हावा - डॉ रघुनाथ माशेलकर
नाशिक :- मविप्रच्या ' प्रज्ञा ' बौद्धिक संपदा केंद्राचे डॉ माशेलकरांच्या हस्ते लोकार्पण
नाशिक हि ज्ञानगंगेची नगरी असून मविप्र ने उभारलेल्या प्रज्ञा केंद्राचा प्रवास हा बुद्धी आणि संपदेच्या एकत्रिकरणातून सरस्वती कडून लक्ष्मीकडे व्हावा असे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी केले ते दि. २८ फेब्रुवारी रोजी मविप्रच्या ' प्रज्ञा ' बौद्धिक संपदा केंद्राचे उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी संस्थेच्या आय एम आर टी महाविद्यालय येथे बोलत होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ सुनील ढिकले, सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर,उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल,सुनील खांडबहाले,संस्थेचे संचालक विजय पगार,अंबादास बनकर,अमित बोरसे, शिक्षणाधिकारी डॉ भास्कर ढोके,डॉ डी डी लोखंडे,डॉ नितीन जाधव उपस्थित होते. या अगोदर मविप्र संस्थेच्या फार्मसी महाविद्यालय येथे प्रज्ञा या बौद्धिक संपदा केंद्राचे पद्मविभूषण डॉ रघुनाथ माशेलकर, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनचे चीफ मेंटॉर श्री.विवेक सावंत,मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, प्राचार्य डॉ दिलीप डेर्ले, केंद्र समन्वयक डॉ मृदुला बेळे यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. पुढे बोलतांना डॉ माशेलकर यांनी ' मविप्र संस्थेने शिक्षण हे भविष्य मानत विद्यार्थी घडवणे हे देश घडविण्याचे कार्य समजून केलेली वाटचाल अभिमानास्पद असल्याचे सांगतांना आपल्या देशात प्रचंड गुणवत्ता आहे. त्यामुळे कल्पनांना वाव आहे. येथील युवक कोणतीही अवघड गोष्ट सोपी करण्यासाठी काही ना काही कल्पना तयार करत असतात. त्यालाच पेटंटची जोड मिळाल्यास त्यातून अर्थार्जन करता येते. आता प्रज्ञा केंद्रामुळे पेटंट करणे देखिल सोपे होणार आहे. आपल्या पुर्वजांनी अनेक बाबींमध्ये शोध लावून त्याचे विविध श्लोकांमध्ये रुपांतर केले आहे. त्याचाच वापर करुन इतर देश नवनवे शोध लावून अर्थार्जन करत असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वजांच्या जीवनाच्या प्रयोगशाळेतील ज्ञानाचा उपयोग नवीन ज्ञान निर्मितीसाठी करावा. यावेळी त्यांनी हळदी व बासमती पेटंट च्या मागील कथा देखील कथन केली. विवेक सावंत यांनी ' मविप्र संस्थेने नॉलेज पॉवर होण्याकरिता प्रयत्न करावेत. तसेच मविप्र प्रज्ञा केंद्राचा प्रवास हा मानवजातीच्या पुढे येणाऱ्या चॅलेंजेस च्या दिशेने मार्गक्रमण करणारा असावा त्यासाठी एमकेसीएल मविप्र संस्थेस सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन त्यांनी दिले.नाशिककर लवकरच पेटंटकर म्हणून ओळखले जातील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांनी ' अशिक्षित समाजाला अक्षर ओळख व्हावी या उद्देशाने सुरु झालेला मविप्र संस्थेचा प्रवास आज प्रगतीच्या दिशेने होत आहे. शैक्षणिक क्षेत्र वेगाने बदलत असतांना प्रज्ञा हे बौद्धिक संपदा केंद्र आजच्या संशोधन काळात महत्वाची भूमिका बजावेल असे सांगतांना संस्थेने सेल्फ फायनान्स व स्कील युनिव्हर्सिटी करिता प्रस्ताव पाठविल्याचे नमूद केले. यावेळी सुनील खांडबहाले लिखित हायटेक वे फॉरवर्ड या पुस्तकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले तसेच संस्थेच्या कर्मवीर ॲड.बाबुराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यायाचा माजी विद्यार्थी अभिजित सोमासे याचा फ्युएल इंजेक्रट सिस्टीम साठी पेटंट ग्रांट झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी डॉ भास्कर ढोके यांनी तर स्वागत व प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ प्रशांत सूर्यवंशी यांनी करून दिला. केंद्र समन्वयक डॉ मृदुला बेळे यांनी बौद्धिक संपदा केंद्राच्या स्थापनेमागील भूमिका विषद केली. सुत्रसंचलन प्रा.मनिषा शुक्ल व आभार प्राचार्य डॉ दिलीप डेर्ले यांनी मानले. याप्रसंगी , ओमप्रकाश कुलकर्णी,अविनाश शिरोडे,विविध शाखांचे प्राचार्य व प्राध्यापक,विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment