स्व.विनायक निम्हण यांचं आरोग्य क्षेत्रातील कार्य समाजासाठी प्रेरणादायी - मंत्री छगन भुजबळ
पुणे दि.६ ऑगस्ट :- माजी आमदार स्व.विनायक निम्हण यांचं आरोग्य क्षेत्रातील कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
माजी आमदार स्व. विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त सोमेश्वर फाऊंडेशनच्या वतीने पुणे येथे आयोजित मोफत महा - आरोग्य शिबीराचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री छगन भुजबळ, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, श्री.सनी निम्हण, माजी मंत्री अर्जुन खोतकर, डॉ सुरेश नवले, राजन तेली यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, स्व.विनायक निम्हण हे आमदार असताना आणि आमदार नसताना देखील त्यांनी सर्व सामान्य लोकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळावी यावर कायमच भर दिला. त्यांनी नेहमीच अश्या पद्धतीच्या आरोग्य शिबिराचे आयोजन करत आणि त्यातून लाखो लोकांना आरोग्याचा लाभ मिळवून दिला. त्यांच्या निधनानंतर ही जबाबदारी सनी निम्हण यांनी आपल्या खांद्यावर घेत सोमेश्वर फाऊंडेशन च्या वतीने हे आरोग्य शिबिर आयोजित केले हे अत्यंत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, शिवाजीनगर मतदार संघाचे नेतृत्व जरी स्व. विनायक निम्हण करत होते तरी आसपासच्या भागातील देखील नागरिकांना आरोग्य शिबिराचा कसा लाभ होईल हा विचार ते नेहमी करत असत. त्यांच्या कार्यकाळात एम्स हॉस्पिटल चे लोकार्पण असेल, पुण्यातील ससून आणि औंध जिल्हा रुग्णायातील अद्यावत सुविधा असतील यासाठी त्यांनी सतत संघर्ष केल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची “स्वस्थ ग्राम – स्वस्थ भारत” ही संकल्पना सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.“रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा” हे ब्रीदवाक्य घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातील गरजु व गरीब रुग्णांसाठी केले जाणारे सेवाकार्यसुध्दा समाजासाठी अतिशय मोलाचे असल्याचे सांगत “विनामुल्य आरोग्य शिबीरचे” आयोजन येथे केले त्याबद्दल स्व. विनायक निम्हण यांच्या समाजसेवेचा वसा पूढे चालवणाऱ्या सनी निम्हन यांचे आभार मानून त्यांनी निम्हण यांना आदरांजली वाहिली.
Comments
Post a Comment