आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्याचा संकल्प -योगशिक्षक संघाच्या मासिक सभेत ठराव
नाशिक : योग शिक्षण, प्रचार व प्रसारासाठी कटिबद्ध महाराष्ट्र योगशिक्षक संघ, नाशिक जिल्हा यांची मासिक सभा दि. ३ जून २०२३ रोजी संघाच्या कार्यालयात घेण्यात आली.
प्रथम योग महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते केल्यावर त्रिवार ओंकार व प्रार्थना घेऊन सभेला सुरुवात करण्यात आली. योगशिक्षक संघातर्फे २१ जूनचा आंतरराष्ट्रीय योग दिवस हा जास्तीत जास्त भव्य करण्यासाठी व जनतेचा सहभाग वाढविण्यासाठी नियोजन करण्यात आले. केंद्रीय आयुष मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या दिलेल्या निर्देशानुसार काय केले पाहिजे याची सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. त्यानुसार संघातर्फे योगशिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण शिबीर येत्या दि. १५, १६, १७ जून रोजी घेण्याचे जाहीर करण्यात आले. या प्रशिक्षणात सहभाग घेण्यासाठी व महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे सदस्य होण्यासाठी नाशिक शहर व जिल्ह्यातील योगशिक्षकांनी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले.
नाशिक महानगरामधील योगसंघाचे विभागप्रमुख किशोर भंडारी, अंजली भालेराव व वैशाली रामपूरकर आदींनी २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या विभागासाठीचा अहवाल जिल्हा कार्यकारणीला सादर केला. नाशिकमधील जास्तीत जास्त शाळा व सामाजिक संस्थाच्या सहकार्याने अतिशय नियोजनबध्दरित्या व भव्यरित्या योग दिवस साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानुसार संघाचे योगशिक्षक विविध शाळांमध्ये जाऊन प्रोटोकॉलनुसार योग दिवसाचा कार्यक्रम घेतील. यावेळी नवीन योगशिक्षक सदस्यांची ओळख व स्वागत करण्यात येऊन पंचवटी विभागातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रक देण्यात आले.
उत्तमराव अहिरे, जीवराम गावले, दिपाली लामधडे व गीता कुलकर्णी यांनी योगाचा प्रचार व प्रसार योगशिक्षक संघाच्या माध्यमातून कसा करता येईल यावर आपली मते मांडली. मिडिया प्रभारी विश्वजित सावंत यांनी योग दिवसानिमित्त सोशल मिडियाबाबत योगशिक्षकांना थोडक्यात मार्गदर्शन केले.
सभेच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा अध्यक्ष जीवराम गावले होते. प्रमुख पाहुणे म्हणून विभाग प्रमुख उत्तमराव अहिरे व राज्य कोषाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते. सूत्रसंचालन.गीता कुलकर्णी यांनी केले, मंदार भागवत यांनी आभार मानले. या मासिक सभेचा समारोप त्रिवार ओंकार व शांतीपाठ घेऊन करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील योग शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment