संस्काराचे बाळकडू बालसाहित्यातूनच मिळते ऐश्वर्य पाटेकर ‘प्राण्यांशी दोस्ती करुया’चे प्रकाशन
नाशिक :- बालकांना संस्काराचे बाळकडू द्यायचे असेल तर बालकविता प्रभावी माध्यम आहेे. पण या बाळकडूची भट्टी जमली पाहिजे. कवयित्री विजया दुधारे यांना प्राण्यांशी दोस्ती करुया या बडबडगीतांच्या माध्यमातून ही भट्टी चांगली जमली आहे, असे प्रतिपादन युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी ऐश्वर्य पाटेकर यांनी केले. सौ.विजया दुधारे लिखित अक्षरबंध प्रकाशित 'प्राण्यांशी दोस्ती करुया' या बडबडगीत संग्रहाचे प्रकाशन मंगळवारी (ता.9) ओझर दहावा मैल येथील अक्षरबाग, आजीच पुस्तकांच्या हॉटेल येथे झाले. या प्रकाशन सोहळ्याच्या प्रसंगी ऐश्वर्य पाटेकर बोलत होते.
अध्यक्षस्थानी नाशिक एज्युकेशन संस्थेचे सरचिटणीस राजेंद्र निकम होते. व्यासपीठावर ऐश्वर्य पाटेकर यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक विवेक उगलमुगले, उत्तम कोळगावकर, कवी आणि अभिनेते राजेंद्र उगले, तसेच पुस्तकांच्या आई सौ.भीमाबाई जोंधळे, सौ.विजया दुधारे यांची उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते वृक्ष आणि संविधान पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. संपादक प्रवीण जोंधळे यांनी स्वागत आणि पाहुण्यांचा परिचय करून दिला.
ऐश्वर्य पाटेकर म्हणाले की आजच्या मुलांना पालक संस्कार सोडून सर्व काही देऊ पाहत आहे. तो चांगला नोकरदार बनला पाहिजे. त्यास गलेलठ्ठ पॅकेज मिळाले पाहिजे यातच पालक अडकले आहेत. पण तो चांगला माणूस बनला पाहिजे यासाठी प्रयत्न करताना कोणी दिसत नाही. त्याला जर चांगला माणूस घडवायचे असेल तर त्याच्यावर योग्य वयात योग्य संस्कार झाले पाहिजे. हे संस्काराचे बाळकडू प्राण्यांशी दोस्ती करुया अशा बालसाहित्यातूनच मिळेल.
प्राण्यांशी घट्ट मैत्रीचं नातं बडबडगीतांच्या माध्यमातून कवयित्री विजया दुधारे यांनी फार सुंदरपणे जोडले आहे. त्यामुळे घराघरांत, शाळांमध्ये हे पुस्तक वाचले जावे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक विवेक उगलमुगले आपल्या मनोगतात मांडले.
ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कोळगावकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की या पुस्तकात प्राण्यांची माहिती देणार्या लयबद्धरचना आहेत. या रचनांमधून लहान मुलांपर्यंत माहिती पोहोचविण्याचा कवयित्रीचा प्रयोग निश्चितच यशस्वी होईल.
यावेळी प्रसिद्ध साहित्यिक राजेंद्र उगले, राजेंद्र निकम, विजया दुधारे यांनीही मनोगत व्यक्त केले. सप्तर्षी माळी यांनी प्रास्ताविक, तर कल्याणी बागडे यांनी सूत्रसंचालन केले. अशोक दुधारे यांनी आभार व्यक्त केले.
अभिनव प्रकाशन
बालगोपाळांनी पक्षी प्राण्यांचे घालून बालगीतांच्या तालावर परडीमध्ये व्यासपीठावर पुस्तक नाचत बागडत घेऊन आली. यावेळी बालगोपाळांनी प्राण्यांच्या वेशभुषेत प्राण्यांशी दोस्ती करुया यातील काही बडबडगीतांचे सादरीकरण केले.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने वाचन संस्कृतीसाठी पुस्तकांची गुढी उभारण्यात आली. उपस्थित बालगोपळांच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले.
Comments
Post a Comment