नाशिक हे ‘लॉजिस्टिक हब’ म्हणून देखील विकसित व्हावं – छगन भुजबळ

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन आयोजित ऑटो अॅण्ड लॉजिस्टिक एक्स्पो व फूड फेस्टिवलचा समारोप
नाशिक मधील ट्रक टर्मिनलसह वाहतूकदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू – छगन भुजबळ
चालक विश्रांती गृहासह इतर प्रश्नांवर देशातील सर्व ट्रान्सपोर्ट चालकांनी एकत्र येऊन आवाज उठविण्याची गरज - छगन भुजबळ
नाशिक  :- नाशिक शहराला ऐतिहासिक, धार्मिक, पर्यटन, सांस्कृतिक महत्व असून नाशिक हे कृषी, शिक्षण, उद्योग, वैद्यकीय हब म्हणून विकसित होत आहे. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये असलेली कृषी बाजार पेठ,ट्रान्सपोर्ट उद्योगाच असलेलं मोठ जाळ आणि रस्त्यासह उपलब्ध पायाभूत सुविधा बघता नाशिक हे येणाऱ्या काळात नाशिक हे ‘लॉजिस्टिक हब’ म्हणून देखील विकसित झालं पाहिजे. यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. 
नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन आयोजित ऑटो अॅण्ड लॉजिस्टिक एक्स्पो व फूड फेस्टिवल समारोप सोहळा आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त अनिसा तडवी, महेश हिरे, अध्यक्ष राजेंद्र फड, कार्यकारी अध्यक्ष पी.एम.सैनी, सेक्रेटरी शंकर धनावडे, माजी अध्यक्ष जयपाल शर्मा, बजरंग शर्मा, सुभाष जांगडा, जे.पी.इंदोरिया, सुनील बुरड, जे.पी.जाधव, संजय तोडी, रामभाऊ सुर्यवंशी, महेंद्रसिंग राजपूत, एच.एन.अग्रवाल, एम.पी.मित्तल, कृपाशंकर सिंग, दलविर प्रधान, विजय लहामगे, सुनील जांगडा, भगवान कटिरा, दलजीत मेहता, राजेश शर्मा, सदाशिव पवार, टीसीआयचे श्री.मिश्रा, निटस मिडियाचे नितीन भोसले यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑटो अॅण्ड लॉजिस्टिक एक्स्पोचे कौतुक करत छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट संघटनेच्या वतीने चालक सुविधा केंद्र उभारण्याच्या उद्देशाने उचलेलं हे पाऊल अतिशय कौतुकास्पद आहे. अगदी सायकल पासून ते महाकाय ट्रेलर पर्यंतच्या वाहनांचा या एक्स्पोत समावेश करण्यात आला. या माध्यमातून या उद्योगाची व्यापकता नाशिककरांनी अनुभवली. तसेच आयोजित रोजगार मेळाव्यातून अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या हे या एक्स्पोचे यश असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संघटनेच्या माध्यमातून होणारे देशातील हे पहिले प्रदर्शन आहे. ही कौतुकास्पद बाब असून यापुढील काळातही असे उपक्रम संस्थेने नियमित सुरु ठेवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ते पुढे म्हणाले की, नाशिक शहराच्या विकासाच्या दृष्टीने आपण विविध विकास कामे केली आहे. विशेष म्हणजे दळणवळण सुलभ व्हावे मुंबई नाशिक धुळे यासह विविध रस्त्यांचे जाळे निर्माण केले. नाशिक शहरातील वाहतुकीचा अडथळा दूर करण्यासाठी आपण उड्डाणपुलाची निर्मिती केली. यावरून सुमारे १०० टन वजनाची वाहने देखील सहज जाऊ शकतात. नाशिक शहराच्या बाहेरून रिंग रोडची देखील विकसित केले आहे. वाढत्या शहरीकरणानुसार शहरातील रस्त्यांचा रुंदीकरण व विस्तार करण्यासाठी आपला पाठपुरावा असेल असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच द्वारका सर्कल काढून सरळ रस्ते विकसित करून सिग्नल यंत्रणा सुरू केली तर द्वारका सर्कलचा प्रश्न सुटेल असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, ट्रान्सपोर्ट हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. देशात पेट्रोल डिझेल चे दैनंदिन वाढणाऱ्या दरामुळे ट्रान्सपोर्ट उद्योग अडचणीत येत असल्याचे त्यांनी म्हटले. चालक हा अतिशय महत्वाचा घटक असताना तो नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. अतिशय कठीण परिस्थितीत तासनतास रस्त्यावर काम करतो. अपघात झाल्यास त्यांना रुग्णवाहिका देखील उपलब्ध होत नाही अशी खंत व्यक्त केली. 

ट्रक टर्मिनलसह वाहतूकदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न नाशिक शहरातील औद्योगिक वसाहतीतील ट्रक टर्मिनल, अडगाव ट्रक टर्मिनलचा विकास व शहरातील चारही प्रवेश द्वारांवर ट्रक टर्मिनल विकसित करण्याची संस्थेची मागणी आहे. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपला शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. येणाऱ्या काळात देखील ट्रक टर्मिनलसह वाहतूकदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू असे छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले. चालक सुविधा केंद्राचे मॉडेल आदर्श ठरेल

आडगाव ट्रक टर्मिनलमध्ये चालक सुविधा केंद्र निर्माण करण्याचा संस्थेचा उद्देश ठेऊन संस्थेने हा अभिनव उपक्रम राबविला. या चालक सुविधा केंद्राच्या माध्यमातून चालकांना आरोग्य सुविधा, उपहार गृह, स्वच्छता गृह, रेस्ट रूम, गॅरेज, पेट्रोल पंप विकसित करण्यात येत आहे. संस्थेच्या वतीने विकसित होणारे हे चालक सुविधा केंद्राचे मॉडेल आदर्श ठरेल असे त्यांनी यावेळी सांगितले.छगन भुजबळ यांच्या हस्ते नियुक्ती पत्राचे वाटप

नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय एक्स्पोत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राज्यातील विविध भागातील बेरोजगार युवकांनी सहभाग घेतला. यामधील काही तरुणांना छगन भुजबळ यांच्या हस्ते नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन