वाचकांच्या हृदयाला साद घालते ती यशस्वी कविता :- संजय वाघ. स्मिता देशपांडे यांच्या स्वच्छंद काव्यसंग्रहाचे झाले प्रकाशन
नाशिक सिडको - कवीने शब्दबद्ध केलेल्या भाव-भावना कवितेच्या माध्यमातून जेव्हा वाचकांच्या हृदयाला साद घालतात, त्यांना त्या कविता आपल्याशा वाटतात तेव्हा ती कविता यशस्वी झाल्याचे अधोरेखित होते, असे प्रतिपादन साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार विजेते संजय वाघ यांनी केले. इंदिरानगर येथील चार्वाक चौकातील बल्लाळ संकुलात सौ. स्मिता गुरुप्रसाद देशपांडे यांच्या ‘स्वच्छंद ’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ लेखिका सुरेखा बोऱ्हाडे यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी वाघ अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. व्यासपीठावर कवयित्री स्मिता देशपांडे, अविनाश बल्हाळ, दिलीप बल्लाळ व सुहास अंजनकर आदी उपस्थित होते. वाघ पुढे म्हणाले, देशपांडे यांच्या संग्रहातील बहुतांशी कवितांमध्ये ‘तो आणि ती’च्या नातेसंदर्भातील प्रेम, विरह, आसक्ती, श्रावण, संगीत व मनातले गाव आदी विषय अगदी तरल व उत्कटतेने अभिव्यक्त झाले असून ही कविता स्वतंत्र अशी शैली घेऊन साकारल्यामुळे ती वाचकाला आपलीशी वाटते. बोऱ्हाडे यांनीही संग्रहाच्या मुखपृष्ठासह वेगवेगळ्या विषयांवर बेतलेल्या कवितांचे कौतुक केले.याप्रसंगी शरदिनी देशपांडे, सुबोध धर्माधिकारी, डॉ. गिरीश बेदरे, प्रशांत देशपांडे, पूर्वा देशपांडे आदिंनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्तविकात दिलीप बल्लाळ यांनी संग्रहाच्या निर्मितीचा प्रवास कथन केला. सूत्रसंचलन डॉ. योगेश जोशी यांनी तर आभारप्रदर्शन गुरुप्रसाद देशपांडे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर देशपांडे, मुकुंद मुंगी, वसंत कुलकर्णी, आशा बल्लाळ,आप्पा दातीर,डॉ.गिरीश बेदरे, सुबोध धर्माधिकारी, नीता बोबडे,दिपाली बल्लाळ आदी रसिक श्रोते उपस्थित होते.
Comments
Post a Comment