डेंग्युला हरविण्यासाठी भागीदारी करावी - डॉ. नितीन रावते, मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य मलेरिया विभागामार्फत दि. १६/०५/२०२३ रोजी जागतिक डेंग्यु दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने मनपाच्या सहाही विभागामध्ये डेंग्यु दिनानिमित्त मलेरिया विभागातील कर्मचारी प्रतिज्ञा घेणार आहे. त्यानंतर मोटारसायकल व्दारे विभागात रॅली काढण्यात येणार आहे. तदनंतर विविध बाजारपेठ, बस स्थानके इत्यादी ठिकाणी खालील प्रमाणे प्रबोधन जनजागृती करण्यात येणार आहे.
डेंग्यु हा विषाणुजन्य आजार असुन "एडीस इजिप्टी डास हा आजारासाठीचे प्रसार माध्यम आहे. एडीस इजिप्टी डास चावल्यानंतर साधारणतः आठवडयानंतर व्यक्तीस डेंग्यु आजाराची लागण होते. या आजारात विविध प्रकारची लक्षणे दिसुन येतात- ताप येणे, डोके दुखी, सांधे दुखी, उलटी- मळमळ, शरीरावर लालसर रंगाचे पुरळ चट्टे येणे इत्यादी हा आजार स्त्री / पुरुष लहान मुले कोणालाही होऊ शकतो व वेळेवर निदान आणि उपचार न झालेस या आजारामुळे रुग्णाचा मृत्युही होऊ शकतो.. त्यामुळे ताप आल्यास तो अंगावर न काढता त्वरीत रक्ताची तपासणी करुन घेणे आवश्यक ठरते. डेंगी या आजाराची तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालय व मनपा रुग्णालय येथे मोफत करण्यात येते. तसेच सर्व मनपा व खाजगी रुग्णालयातील रुग्णांचे रक्तजल नमुने संकलित करुन जिल्हा सामान्य रुग्णालय नाशिक येथे तपासणीसाठी पाठविले जातात. सदर तपासणीसाठी रुग्णाकडुन कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
या आजाराचा प्रसार करणारा एडीस डास हा दिवसा चावतो व याच्या शरीरावर वाघाच्या शरीरासारखे पट्टे असलेने यास टायगर मॉस्किटो असेही म्हटले जाते. एडीस डासाची उत्पत्ती ही साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते व डासाचे जीनवचक्र एक आठवड्यात पुर्ण होते. तेंव्हा या आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांत सर्वात महत्वाचे म्हणजे डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे, यासाठी नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य मलेरिया विभागामार्फत सातत्याने प्रयत्न करत असुन नागरीकांनी स्वखुशीने त्यात सहभागी होणे अत्यावश्यक आहे. सर्व नाशिककरांनी आपल्या घरातील सर्व पाण्याचे साठे आठवड्यातुन एक दिवस घासुन पुसुन कोरडे करुन मगच त्यात पाणी साठवणे आवश्यक आहे. तसेच पाण्याचे सर्व साठे झाकुन ठेवावे जेणेकरुन डासांना त्यात अंडी घालण्यासाठी जागा उपलब्ध होणार नाही. आपले घराचे छतावर अडगळीचे अथवा वापरात नसलेले भंगार सामान साठवु नये, त्यात पावसाचे पाणी साचुन डासांची उत्पत्ती होऊ शकते. तसेच बऱ्याच ठिकाणी व भंगाराच्या दुकानात वापरुन झालेले टायर्स साठवण्यात येतात या टायर्स मध्येही पावसाचे पाणी साचुन डासांची उत्पत्ती होऊ शकते. तेव्हा भंगार सामानची वेळेवर विल्हेवाट लावणे आवश्यक आहे अथवा सदर सामान झाकुन ठेवावे. घरातील फुलदाण्या, कुलर्स, फ्रिजर्स ट्रे वेळोवेळी स्वच्छ करावे जेणे करुन त्यात डासोत्पत्ती होणार नाही.
दरवर्षी केंद्र शासनाच्या सुचनानुसार १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यु दिन नाशिक महानगरपालिका मलेरिया विभागामार्फत साजरा करण्यात येतो. या मोहिमेचा मुख्य उद्देश म्हणजे जनतेचा सक्रिय सहभाग प्राप्त करुन घेणे हा असुन यात विविध कार्यक्रम मलेरिया विभागामार्फत राबविण्यात येतात. या वर्षी डेंग्यु दिनासाठी “Harness Partnership To Defeat Dengue" अशी थीम देणेत आलेली आहे. तेव्हा मनपा हद्दीत खाजगी वैदयकिय व्यावसायिक, नागरीकांनी आरोग्य सेवासोबत भागीदारी करुन डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवु या डेंग्युला दूर ठेवू या.
- डॉ. नितीन रावते,
(वैद्यकीय आरोग्य अधिकारी, नाशिक महानगरपालिका; नाशिक)
Comments
Post a Comment