( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) गडकिल्ले संदर्भात जयकुमार रावल यांचे स्पष्टीकरण

( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख )
ऐतिहासिक किल्ल्यांचा हॉटेलिंगसाठी वापर ही बातमी चुकीची


मुंबई, दि.०६/०९/२०१९ राज्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि छत्रपती शिवरायांच्या शौर्याचे साक्षीदार असलेल्या किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. या किल्ल्यांचा वापर हॉटेलिंग किंवा लग्न समारंभासाठी होणार असल्याच्या बातम्या पूर्णत: निराधार आणि खोट्या आहेत, असे स्पष्टीकरण राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे.

शासनाने राज्यातील अत्यंत दुर्लक्षित असलेल्या किंवा पडझड होत असलेल्या वर्ग 2 दर्जाच्या किल्ल्यांचा हेरीटेज विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. गावागावात असलेल्या या किल्ल्यांची मोठी दुरावस्था झाली आहे. आधीच्या सरकारच्या काळात या किल्ल्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले. आता वर्ग 2 दर्जाच्या या किल्ल्यांची देखभाल – दुरुस्ती, जतन-संवर्धन व त्यांचा पर्यटनदृष्ट्या हेरीटेज विकास करण्यासाठी धोरण आखण्यात आले आहे. पण या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावत राज्यातील ऐतिहासिक किल्ल्यांचे हेरीटेज हॉटेल किंवा लग्न कार्यालयामध्ये रुपांतरण करण्यात येणार असल्याच्या चुकीच्या बातम्या माध्यमांमधून प्रसारीत होत आहेत. राज्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अशा कोणत्याही किल्ल्याचे हॉटेल किंवा लग्न कार्यालयामध्ये रुपांतरण करण्यात येणार नाही. हे किल्ले पूर्णत: संरक्षित असून केंद्रीय पुरातत्व खात्याच्या निकषानुसार त्यांचे जतन आणि संवर्धन करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि गडकोट किल्ले हा महाराष्ट्राचा अमूल्य ठेवा आहे. त्याचे ऐतिहासिक मूल्य जपून त्यादृष्टीने या किल्ल्यांचा सर्वांगिण विकास राज्य सरकार करत आहे. तसेच या गडकोट किल्यांचे संरक्षण, संवर्धन आणि ऐतिहासिक पावित्र्य जपण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असेही श्री.रावल यांनी यावेळी सांगितले.
राज्यात वर्ग 1 आणि वर्ग 2 असे दोन प्रकारचे किल्ले आहेत. ऐतिहासिक संदर्भ असलेले किल्ले हे वर्ग 1 मध्ये येतात आणि अन्य किल्ले वर्ग 2 मध्ये येतात. वर्ग 1 चे किल्ले हे संरक्षित वर्गवारीत येतात. केंद्र आणि राज्य सरकारचा पुरातत्त्व विभाग या किल्ल्यांच्या संरक्षण व संवर्धनाचे काम करीत आहे आणि त्या किल्ल्यांच्या विकासाचे स्वतंत्र धोरण हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा म्हणूनच ते जतन करण्यात येतील. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले किल्ले हे कुठल्याही परिस्थितीत ऐतिहासिक अर्थानेच जपले जातील आणि त्याचे पावित्र्य तसेच कायम राखले जाईल.
वर्ग 2 चे किल्ले हे असंरक्षित वर्गवारीत येतात. त्याचा पर्यटन विकासासाठी ऐतिहासिक स्थळे म्हणून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला आहे. असे किल्ले काळाच्या ओघात उद्ध्वस्त होऊ नयेत, त्यांचा दुरुपयोग होऊ नये, त्यांचे संवर्धन करून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करावी आणि पर्यटकांचा तेथे वावर वाढावा या हेतूने राज्य सरकारने या किल्ल्यांच्या हेरीटेज विकासासाठी धोरण आखले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments

  1. सरकार नक्की काय करणार आहेत हे समजावून सांगण्यात सरकार कमी पडले
    लोकांचा गैरसमज का झाला किंवा जनता सरकारचा निषेध करायला लागली त्यानंतर स्पष्टीकरण देण्याचं शाहानपन सुचलं याचा अर्थ काय❓ गडकिल्ल्याचा हेरीटेज विकास म्हणजे मुळ संकल्पना काय काय आहे हे गुलदस्त्यातच आहे, लोकांच्या भावना व प्रतिक्रीया ज्या पद्धतीने व्यक्त झाल्या त्याच पद्धतीने समाधानकारक स्पष्टीकरण दिलं हे उघडच आहे, आणि सरकारच्या वास्तविक धोरणाचे अकलन जनतेने केले म्हणून संतप्त प्रतिक्रिया दिल्या याचा थेट परिणाम विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो याचं भान ठेवले पाहिजे,

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला