कुंभमेळ्याशी निगडित विकास कामे मोहिमस्तरावर पूर्ण करावीतजलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आढावा बैठकीत निर्देश
नाशिक,दि.26 :- नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी कुंभमेळा होत आहे. कुंभमेळ्याशी निगडित विविध विकास कामे मोहिमस्तरावर पूर्ण करावीत, असे निर्देश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी नाशिक शहरातील द्वारका सर्कल अंडरपास,नदी घाटांचे बांधकाम, विमानतळ विस्तारीकरण यासह विविध विकास कामांचा मंत्री महाजन यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम,नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.मंत्री महाजन म्हणाले की,पुढील वर्षी कुंभमेळा होत असून यावर्षी ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल.आगामी कुंभमेळा स्वच्छ,सुंदर, पर्यावरणपूरक आणि सुरक्षित करावयाचा आहे.देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखत घाटांचे बांधकाम,रस्ते,विमानतळ विस्तारीकरणाची कामे वेळेत पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी. द्वारका सर्कलचे काम वेळेत पूर्ण होईल,असे नियोजन करावे.तसेच वाहतूक विस्कळीत होणार नाही याचीही दक्षता घ्यावी. विकास कामांमधील भूसंपादन हा महत्वाचा विषय आहे.भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती द्यावी. आवश्यकतेनुसार मनुष्यबळ वाढवावे.तसेच वृक्षारोपण मोहीम राबवीत रोपांचे संवर्धन करावे, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले.विभागीय आयुक्त डॉ.गेडाम यांनी सांगितले की,सर्व कामे वेळेत पूर्ण होतील याची सर्व विभागांनी दक्षता घ्यावी.प्रशासकीय विभागांनी कुंभमेळ्याशी निगडित कामांना प्राधान्य द्यावे.कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त सिंह यांनीही विविध सूचना केल्या.जिल्हाधिकारी प्रसाद यांनी भूसंपादन प्रक्रिया,विकास कामांची सद्यस्थिती याविषयी माहिती दिली. तसेच भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती देऊन विकास कामे वेळेत पूर्ण होतील,असे सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा