राजीव गांधी भवन येथे आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत गोदावरी प्रदूषण नियंत्रण उपसमितीची बैठक

नाशिक : (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) रेन वॉटर हार्वेस्टिंगची उत्कृष्ट अंमलबजावणी केलेल्या सोसायट्यांना पुरस्कार देणार,गोदावरी प्रदूषण नियंत्रण उपसमितीच्या बैठकीत निर्णय, कापडी पिशव्यांचा वापर वाढविण्याचे नियोजन मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे गोदावरी प्रदूषण नियंत्रण उपसमितीची बैठक आज दि. २४ एप्रिल रोजी पार पडली. मा. आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. उपायुक्त (गोदावरी संवर्धन कक्ष) डॉ. विजयकुमार मुंढे यांनी प्रास्तविक केले. मनपाकडून प्लॅस्टिक बंदी मोहिमेची यशस्वीपणे अंमलबजावणी होत आहे. ही मोहिम आणखी व्यापक करुन कापडी पिशव्यांचा वापर वाढविण्याकडे लक्ष दिले जाणार आहे. त्यासाठी बचत गटांमार्फत वेंडींग मशीन लावण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. या पिशव्यांवर प्लास्टिक बंदीचा मजकूर आणि मनपाचा लोगो असणार आहे. तसेच पर्यावरणपूरक मित्र इमारत आणि पर्यावरणपूरक मित्र सोसायटी (मोस्ट एन्व्हायरमेंट फ्रेन्डली बिल्डिंग/सोसायटी) असे पुरस्कार मनपा देणार आहे. त्यासाठी मनपाच्या वेबसाईटवर गोदावरी संवर्धन कक्ष विभागाच्या लिंकवर माहिती पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १५ मेपर्यंत माहिती पाठवायची आहे. स्वच्छ झोपडपट्टी (मोस्ट क्लिन स्लम) अशीही पुरस्कार योजना लवकरच राबिवली जाणार असल्याचे मा. आयुक्तांनी बैठकीत सांगितले. याशिवाय गोदावरी आणि उपनद्यांचे प्रदूषण थांबविण्यासाठी विविध मुद्यांवर चर्चा झाली. 

मलशुद्धीकरण प्रकल्प अद्ययावत करणार

तपोवन, आगरटाकळी, चेहर्डी, पंचक या चार मलशुद्धीकरण केंद्रांची (एसटीपी) अद्ययावत सुधारणा करण्याच्या कामाचे सविस्तर प्रकल्प अहवाल एनआरसीडी (राष्ट्रीय नदी संवर्धन विभाग) यांच्याकडे सादर केले आहेत. त्यांच्याकडून आयआयटी रूरकी यांच्याकडे हे अहवाल तपासणीसाठी दिले आहेत. तपोवन आणि आगरटाकळी या दोन मलशुद्धीकरण केंद्राच्या सुधारणेसाठी शासनाच्या तांत्रिक समितीची मंजुरी मिळाली आहे. केंद्राच्या अमृत २.० योजनेतही ते प्रस्तावित केले आहेत. तसेच मखमलाबाद, कामटवाडा येथे दोन नवीन मलशुद्धीकरण प्रकल्प उभारणार असल्याची माहिती मनपाचे अधिक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी यावेळी दिली. तसेच ‘नमामी गोदा’ प्रकल्पासाठी सल्लागार कंपनीने मलजल वाहिनीचे (सिव्हर लाईन) ३० टक्के सर्व्हेक्षण पूर्ण केले आहे. जीआयएस मॅपिंगचे काम सुरु असल्याची माहीती चव्हाणके यांनी दिली. या बैठकीला अशासकीय सदस्य राजेश पंडीत, निशिकांत पगारे यांच्यासह 'नेरी' संस्थेचे अजित गोखले बैठकीत ऑनलाईन सहभागी झाले होते. उपप्रादेशीक अधिकारी (एमपीसीबी) अमर दुर्गुळ, विभागीय माहिती उपसंचालक ज्ञानेश्वर इगवे, उपायुक्त करुणा डहाळे, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, स्मार्ट सिटी सीईओ सुमंत मोरे, घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. कल्पना कुटे, नगर नियोजन विभाग उपसंचालक हर्षल बाविस्कर, कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल, संदेश शिंदे, गणेश मैड, राजेंद्र शिंदे, नितीन धामणे, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम बैठकीला उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला