कथक आकृती नृत्य संस्थेचा प्रक्षेपण सोहळा उत्साहात संपन्न
नाशिक :- कालिदास कला मंदिर, येथे कथक गुरू नृत्यश्री विद्या हरी देशपांडे आणि ज्येष्ठ कलाकार सुनील देशपांडे,यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सुरुवात झाली.कथक आकृती डान्स कंपनी ही भावी काळात विविध नृत्य संस्था,सांस्कृतिक संघटना तसेच कॉर्पोरेट कार्यक्रमांसोबत सहयोगासाठी खुली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. नृत्यकलेच्या प्रसारा साठी आणि नव्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही कंपनी महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.कथक आकृतीचे को.फाऊंडर्स श्वेता चंद्रात्रे फडणीस,अनुष्का घुगे,अदिती गोरे- हलकरे आणि रागिणी कुलकर्णी यांनी कार्यक्रमाची सुरुवात विष्णू वंदना आणि पंडित बिंदादिन महाराज यांनी रचलेल्या"निरतत ढंग"या अष्टपदीने केली.यानंतर कथक आकृतीच्या विद्यार्थिनींनी गणेश वंदना तसेच तराना आणि तोड़े-तुकडे यांची मनोहारी प्रस्तुती सादर केली.पुढे ताल अष्टमंगल ११ मात्रा आणि पंडिता रोहिणी ताई भाटे यांनी रचित"काहे करत भर जोरी, जक्का जोरी"या ठुमरीवर चौघींनी भावपूर्ण अभिनय व लयकरी यांची सुंदर गुंफण सादर केली.कार्यक्रमाची सांगता राग बागेश्रीतील तरानाच्या फ्यूजन स्वरूपातील आकर्षक नृत्यरचनेने करण्यात आली.साथ-संगत प्रभावी होती. तबल्यावर अद्वय पवार,गायन व संवादिनी अभिजीत भाटजिरे,सितार प्रतिक पंडित,तसेच बासरी समृद्ध कुटे,वेस्टर्न पर्कशनची जबाबदारी प्रफुल्ल पवार,पढंत वृशाली राव,यांनी नृत्याला सुरेल साथ दिली.सूत्रसंचालन चित्रा राजगुरू,यांनी केले.या शुभारंभ प्रसंगी नृत्यप्रेमी, विद्यार्थी,पालक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा