नाशिक येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसचा सुरक्षा मुद्रणातील उत्कृष्टतेचा शतकपूर्ती सोहळा संपन्न
नाशिक :- इंडिया सिक्युरिटी प्रेसने (भारतीय सुरक्षा मुद्रणालय) 7 मार्च 2026 रोजी आपल्या स्थापनेचा शतकपूर्ती दिवस साजरा केला. शताब्दी सोहळ्याला अर्थ मंत्रालयाच्या सचिव (आर्थिक व्यवहार) अनुराधा ठाकूर, अपर्णा भाटिया, विजय रंजन सिंह, दळणवळण मंत्रालयाच्या टपाल विभागाच्या सुचिता अनंत जोशी; आणि देवेंद्र कुमार रथ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

अर्थ मंत्रालयाचे सचिव (आर्थिक व्यवहार), यांच्या हस्ते शताब्दी द्वार आणि शताब्दी उद्यानाच्या उद्घाटनाने या शताब्दी सोहळ्याची सुरुवात झाली.

आर्थिक व्यवहार सचिव अनुराधा ठाकूर यांनी उपस्थितांना संबोधित केले.यावेळी त्यांनी इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या शताब्दीनिमित्त एक विशेष टपाल तिकीट प्रकाशित केले. सुरक्षा मुद्रणाशी संबंधित महत्त्वाची आणि सार्वभौम कार्ये पार पाडून, आयएसपी, राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.एसपीएमसीआयएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय रंजन सिंह यांनी नाशिकमधील इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस,या दोन युनिट्सच्या महत्वाच्या योगदानाची प्रशंसा केली. त्यांनी नमूद केले की, महामंडळाच्या एकूण नफ्यात या युनिट्सचा एकत्रितपणे सुमारे 51% वाटा आहे.

भारताच्या आर्थिक आणि राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यामधील इंडिया सिक्युरिटी प्रेसचा समृद्ध वारसा आणि सातत्यपूर्ण प्रासंगिकता देखील या कार्यक्रमाने अधोरेखित केली. 300 हून अधिक सुरक्षा उत्पादनांच्या पोर्टफोलिओसह, प्रेस उच्च-सुरक्षा दस्तऐवज तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावते. प्रेसच्या सर्वात प्रतिष्ठित उत्पादनांपैकी एक म्हणजे भारतीय पासपोर्ट,जो बहुतेकदा भारतीय नागरिक आणि जागतिक समुदायामधील पहिला दुवा मानला जातो.या प्रतिष्ठित दस्तऐवजाचे महत्त्व लक्षात ठेवण्यासाठी, सचिव (आर्थिक व्यवहार) यांच्या हस्ते, "द सॉवरेन सील: इंडियाज पासपोर्ट स्टोरी" या शीर्षकाचे कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्यात आले.यावेळी अर्थ मंत्रालयाचे सचिव (आर्थिक व्यवहार), यांनी ई-पासपोर्ट प्रकल्पासाठीच्या पायाभूत सुविधांचे लोकार्पण केले.इंडिया सिक्युरिटी प्रेसचे मुख्य महाव्यवस्थापक राजेश बन्सल यांनी आपल्या स्वागतपर भाषणात संस्थेच्या गेल्या शतकातील उल्लेखनीय प्रवासाची रूपरेषा सांगितली आणि या काळात साध्य केलेले महत्त्वाच्या टप्पे अधोरेखित केले. कामगारांच्या वतीने बोलताना आयएसपी मजदूर संघाचे अध्यक्ष जगदीश गोडसे यांनी कामगार आणि व्यवस्थापन यांच्यातील सहकार्याच्या भावनेवर प्रकाश टाकला. इंडिया सिक्युरिटी प्रेसची प्रतिष्ठा आणि वारसा जपण्याप्रति, कर्मचाऱ्यांच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या इंडिया सिक्युरिटी प्रेस (आयएसपी) ने भारताची सुरक्षा मुद्रण परिसंस्था मजबूत करण्यात महत्वाची भूमिका बजावली. स्वातंत्र्यानंतर, प्रेसने अर्थ मंत्रालया अंतर्गत एक स्वतंत्र विभाग म्हणून काम केले. या शताब्दी सोहळ्याने देशाच्या सुरक्षा मुद्रण पायाभूत सुविधांमधील इंडिया सिक्युरिटी प्रेसचा ऐतिहासिक वारसा आणि शाश्वत योगदान अधोरेखित केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा