णमोकार तीर्थ हे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर ते मानवतेला दिशा देणारे आध्यात्मिक विद्यापीठ - मंत्री छगन भुजबळ
णमोकार तीर्थ आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा एवं महास्तकाभिषेक महोत्सवास मंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती
णमोकार तीर्थ हे केवळ मंदिर न राहता ते विश्वशांतीचा संदेश देणारे केंद्र बनेल - मंत्री छगन भुजबळ
जगाच्या तणावाच्या परिस्थितीत शांतता निर्माण करण्यासाठी जैन समाजाचा अहिंसेचा विचार अधिक महत्वाचा - मंत्री छगन भुजबळ
नाशिक,चांदवड :- णमोकार तीर्थ हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर ते मानवतेला दिशा देणारे आध्यात्मिक विद्यापीठ आहे.जैन धर्माने जगाला अहिंसा, सत्य,करुणा आणि संयम यांचा संदेश दिला आहे. आजच्या अस्थिर आणि तणावपूर्ण वातावरणात हा संदेश अधिक महत्त्वाचा ठरतो. आजच्या या जगाच्या तणावाच्या परिस्थितीत जगात अहिंसा निर्माण होण्यासाठी जैन समाजाचे योगदान अतिशय महत्त्वाचे राहील असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.णमोकार तीर्थ,आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा एवं महास्तकाभिषेक महोत्सव, मालसाने,ता.चांदवड, जि.नाशिक येथे आज मोक्षकल्याण, विश्वशांती महायज्ञ आणि समारोप सोहळा पार पडला.सोहळ्यास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली.यावेळी मंत्री छगन भुजबळ,यांनी जैन संतवृंद आदरणीय गणधिपती गणधनाचार्य श्री १०८ कुंथुसागर महाराज साहब, परमपूज्य ज्ञानयोगी प्रज्ञाश्रमण देवनंदी महाराज साहब,परमपूज्य पुष्पदंत सागर महाराज,परमपूज्य अमोघकीर्तीजी महाराज, परमपूज्य अमरकीर्तीजी महाराज यांच्यासह उपस्थित सर्व प्रमुख संतांचे पूजन केले.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी सुवंद्य सागर यांच्या मुलाचार प्रदीप या ग्रंथाचे लोकार्पण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी महोत्सव समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष पेंढारी,भूषण कासलीवाल,सुमेरकुमार काले, अल्केश कासलीवाल,रघुनाथ आहेर,ललित पाटणी,नीलम अजमेरा,विजय लोहाडे,चंद्रशेखर कासलीवाल,पवन पाटणी,डॉ.अतुल जैन, डॉ.सोनल दगडे कासलीवाल यांच्यासह जैन समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, समाजाचा विकास केवळ भौतिक प्रगतीत नसून तो नैतिक मूल्ये आणि अध्यात्मिक संस्कारांमध्येही असतो आणि णमोकार तीर्थ हे त्याचे जिवंत उदाहरण आहे.रस्ते,उद्योग,इमारती आणि पायाभूत सुविधा समाजाला प्रगती देतात; पण संस्कार, अध्यात्म आणि मूल्ये समाजाला दिशा देतात. णमोकार तीर्थ हे विकास आणि संस्कार यांचा सुंदर संगम आहे. सुमारे ४७ एकर परिसरात उभारलेले हे तीर्थ श्रद्धा आणि आधुनिकतेचा संगम घडवत आहे असे त्यांनी सांगितले. संतानी केलेल्या मागण्यांप्रमाणे जैन संतांच्या निवास स्थानाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, कुंथुसागर महाराज,देवनंदी महाराज आणि इतर प्रमुख जैन संतांचे मार्गदर्शन समाजाला आध्यात्मिक ऊर्जा देणारे आहे. त्यांच्या शिकवणीतून समाजात शांतता,सद्भावना आणि बंधुभाव वाढण्यास नक्कीच मदत होईल. या महोत्सवात आज मोक्षकल्याण, विश्वशांती महायज्ञ आणि समारोप सोहळ्याने होणार आहे. विश्वशांती आणि मानवकल्याणाचा संदेश देणारा हा महायज्ञ संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरेल असे त्यांनी सांगितले.ते म्हणाले की,नाशिक जिल्ह्याची ओळख ही नेहमीच धार्मिक,सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळींचे केंद्र म्हणून राहिली आहे.कुंभमेळा,तीर्थक्षेत्रे आणि विविध आध्यात्मिक परंपरांनी ही भूमी समृद्ध केली आहे.णमोकार तीर्थामुळे नाशिकची ही ओळख आणखी भक्कम होईल आणि पर्यटन,रोजगार तसेच स्थानिक विकासालाही चालना मिळेल.समाजात समता, सामाजिक न्याय आणि मानवतेची भावना रुजविण्याचे कार्य धर्म आणि अध्यात्माच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे करता येते.जैन धर्माने दिलेला अहिंसा आणि समतेचा संदेश समाजाला एकत्र आणणारा असल्याचे त्यांनी सांगितले.ते म्हणाले की,धर्म आणि विकास यांचा परस्पर संबंध जोडणारा हा प्रकल्प नाशिकच्या सर्वांगीण प्रगतीचा नवा अध्याय ठरेल.णमोकार तीर्थ हे केवळ मंदिर न राहता,विश्वशांतीचा संदेश देणारे केंद्र,नाशिकच्या विकासाचा आधार आणि मानवतेला दिशा देणारे आध्यात्मिक शक्तीस्थान बनेल.णमोकार तीर्थ यापुढील हजारो वर्ष विश्वशांती, मानवकल्याण आणि आध्यात्मिक जागृतीचा संदेश देत राहील असे त्यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा