स्वच्छ नंदिनी - स्वच्छ गोदावरी, मलनिस्सारण प्रकल्पांना वेग, नदीपात्र स्वच्छतेस गती
नाशिक :- शहरातील सांडपाणी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांचा महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी आढावा घेतला. शहरात विविध ठिकाणी सांडपाणी अडवून ते सांडपाणी प्रक्रिया केंद्रांकडे (STP) वळविण्याची व्यवस्था उभारण्यात येत आहे,या माध्यमातून थेट नदीपात्रात जाणारे सांडपाणी रोखण्यावर भर दिला जात आहे.याच अनुषंगाने मनपा आयुक्तांनी नंदिनी नदी परिसरातील महत्त्वाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच आगार टाकळी येथील नंदिनी-गोदावरी संगमावर बांधण्यात येत असलेल्या बंधाऱ्याची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना कामाची गुणवत्ता अबाधित राखत सर्व प्रलंबित कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.सिंहस्थ कुंभमेळा २०२७ करिता उपलब्ध असलेला अल्प कालावधी लक्षात घेता, नाशिक महानगरपालिका क्षेत्रात PPP-HAM मॉडेल तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या मलनिस्सारण प्रकल्पांना गती देणे अत्यंत आवश्यक असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.पाटबंधारे विभागामार्फत बांधण्यात येणाऱ्या घाटांच्या अनुषंगाने नंदिनी-गोदावरी संगमावरील बंधाऱ्याचे काम अत्यंत महत्त्वाचे असून ते वेळेत पूर्ण होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पावसाळा सुरू होण्यापूर्वी संबंधित सर्व कामे पूर्ण करणे अनिवार्य असून,यासाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त यंत्रसामग्री व मनुष्यबळ तातडीने तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले.तसेच काम वेळेत पूर्ण करण्यासाठी दोन शिफ्टमध्ये काम सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात यावे,असेही त्यांनी सांगितले.या अनुषंगाने आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.नदीपात्र स्वच्छ ठेवणे,पर्यावरण संरक्षण आणि शहरातील स्वच्छता व्यवस्थेला बळकटी देणे हा या प्रकल्पांचा मुख्य उद्देश असून, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही कामे अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत.
सुविधा / टप्पा
तांत्रिक तपशील
क्षमता
कार्य
नंदिनी I & D (बंधारा)
इंटरसेप्शन आणि डायव्हर्शन
३७.९ MLD
कच्च्या सांडपाण्याचे संकलन करणे.
वहन जलवाहिनी
१५०० मिमी dia MS पाईपलाईन
५८० मीटर
गुरुत्वाकर्षण द्वारे अगरटाकळी SPS कडे वहन.
अगरटाकळी SPS
सांडपाणी उपसा केंद्र
७४.५ MLD
सांडपाणी पंपाद्वारे पुढे पाठवणे.
अगरटाकळी STP
सांडपाणी प्रक्रिया केंद्र
९७.० MLD
संकलित सांडपाण्यावर अंतिम प्रक्रिया करणे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा